कर्जत विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महायुतीचा बंडखोर तर एका बाजूला मविआ असा सामना पाहायला मिळत आहे.
कर्जत हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मूळ शिवसेनेत कायम बंडखोरी अथवा कधी मित्रपक्ष भाजप नाराज झाल्याने अथवा मतांचे ध्रुवीकरण झाल्याने कायम इथे राष्ट्रवादी काँग्रेस ने प्रतिनिधित्व केले आहे.

कर्जत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील थोड्या प्रमाणात मतदार आहे. हा मतदार नेहमी कोणाच्या बाजूला झुकतो यावर देखील यशाचे गणित अवलंबून आहे.
महायुती मध्ये असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे दोन भाग झाले. त्यात बहुतांशी शिवसेना पक्षाचे पुढारी हे शिंदे गटाकडे गेले असले तरी मतदार हा उबाठा सेनेकडे दिसून येतो. काही भागात उबाठा सेनेची पडझडं झालेली आहे. तर काही भागात उबाठा सेना प्रचंड मजबूत आहे.
सन 2014 साली केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेत आली पण त्याचा विशेष परिणाम हा कर्जतच्या संघटनेवर झाला नाही. 2019 मध्ये हा मतदारसंघ तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हेरल्यावर या ठिकाणी भाजपचा विस्तार झाला. तसेच ही जागा महायुतीकडे गेली.
सध्या कर्जत मध्ये महायुतीकडून महेंद्र थोरवे तर युतीचे बंडखोर म्हणून अपक्ष सुधाकर घारे व महाविकास आघाडी कडून नितीन सावंत हे उभे आहेत. कर्जतची ही लढाई आतां महायुती अथवा महाविकास आघाडी नसून तर व्यक्तीच्या कार्य कर्तृत्वाची लढाई बनलेली आहे. महाविकास आघाडी कर्जत मध्ये मागे पडल्याने तिकडे चिंतेचे वातावरण अधिक आहे. काही घटक पक्षांचे पुढारी हे मैदान सोडून पळाले आहेत. त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी व उबाठा गटातील पुढारी वर्गाचा समावेश आहे.

महायुती मध्ये नाराजी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवाराने अर्ज भरले व भाजपचा अर्ज मागे घेतल्याने महायुतीच्या मतदारामध्ये दोन पर्याय निर्माण झाले. या दोन्ही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरताना विद्यमान आमदार थोरवे यांच्या मनमानी आणि दडपशाहीचे कारण दिले होते. पण भाजपा उमेदवार यांनी अर्ज मागे घेतला..पर्यायी कर्जत मध्ये महायुती विरुद्ध महायुती (अपक्ष) व मविआ अशी फाईट सुरु झाली. या लढतीत पक्षांपेक्षा व्यक्तीलाच महत्व आले आहे.
शहरी भाग वगळता भाजपच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाविरुद्ध ग्रामीण भागात संघर्ष केला आहे. प्रत्येक संघर्षाच्या घटनेवेळी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्याना सरकारी अधिकारी यांची मनमानी व शिंदे गटाच्या दडपशाहीला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मनात विद्यमान आमदार यांच्या विरोधी राग आहे. त्यामुळे महायुतीच्या एकूण मतदानाला सुरुंग लागला आहे पण त्याचा फायदा हा मविआ ला नाही तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना होण्याचे जास्त चान्सेस आहेत.
सुधाकर घारे यांना लौकिक अर्थाने अपक्ष असे म्हणता येणार नाही कारण त्यांच्या मागे पूर्ण पक्ष उभा आहे. तसेच भाजपचा एक नाराज गट थोरवे यांचे काम करण्यास अनुकुल नाही. महायुतीच्या पुढऱ्यांचा आम्हाला आदर आहे पण आम्हाला थोरवे नको अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्ते व मतदार यांची असल्याचे चित्र आहे..
सध्या कर्जत मध्ये सुधाकर घारे हे थोरवे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून फोकस झाले आहेत उलट घारे यांचे वरिष्ट नेते तटकरे यांच्यावर टीका करून थोरवे यांनी ते प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत यावर शिक्कामोर्तब केले. या आधी आमदार असणारे लाड हे नेहमी विरोधकांना चकवा देत असत कारण मतदाराला लाड यांचा मुख्य विरोधक कोण? याचा पत्ता लागत नसे. यावेळी थोरवे यांनीच त्यांच्या विरोधकांना हे कोलीत दिले आहे.
घारे यांचे सुरवातीपासून संघटना व मतदार यांचे एकत्रित पारडे जड असल्याने थोरवे यांना मतदारांची बेरीज करावी लागत आहे. त्यासाठी ते युतीचा मतदार फुटू नये म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. तसेच भाजपच्या एका कार्यकर्त्यापासून ते मविआच्या जिल्हा प्रमुखाचा प्रवेश करून घेत आहेत.

घारे यांनी देखील आपली मतांची बेरीज करण्यासाठी मनसे, आप अशी विविध कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. तर थोरवे यांनी नाराज असणाऱ्या सुरेश लाड यांची भाजपा वरिष्ठ यांच्या पाठीब्याने मनधरणी केली आहे. लाड हे थोरवे यांना बेरजेचे राजकारण करण्यासाठी मदत करू शकतात अशी थोरवे यांची धारणा आहे. परंतु लाड हे कट्टर प्रतिस्पर्धी थोरवे यांच्यासोबत गेल्याचे लाड समर्थक यांना रुचलेले नाही.
हे काही असले तरी महायुती व महाविकास आघाडीचा कट्टर मतदार वगळता दोन्ही मतदारांनी व्यक्तीला प्राधान्य दिल्याचे समजून येईल. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही फुटल्याने मतदार या मधील व्यक्तीच्या मागे जाण्याची शक्यता अधिक आहे. कारण घारे निवडून आल्यास महायुती सोबत जाण्याची शक्यता अधिक आहे असे थोरवे यांनीच प्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करून स्पष्ट केले आहे. तटकरे हे सबंध महाराष्ट्र राज्यात युतीचेच काम करत आहेत. सुधाकर घारे यांना निवडून न येऊ देण्यासाठी व त्यांच्या मागे असणारा मविआ चा मतदार तोडण्याची थोरवे यांची ही शक्कल असू शकते पण त्याचा विशेष फायदा न होता तोटा दिसत आहे..
कर्जत मतदारसंघातील जनतेचा महायुतीत दोन व्यक्ती तर मविआ मधल्या एका व्यक्तीचा पर्याय आहे. त्यामुळे थोरवे यांना वैयक्तिक विरोध म्हणून जनता कोणत्या व्यक्तीला महत्व देते हे महत्वाचे आहे. जर मविआ निवडून येणार नाही असे लक्षात आल्यास मविआ चा मतदार हा थोरवे यांच्या ऐवजी घारे यांना पसंती देऊ शकतो व त्यात स्थानिक दडपशाही हे मुख्य कारण मानले जाऊ शकते.
जेव्हा तत्व व विचारांचे राजकारण मागे पडते तेव्हा व्यक्तीसंपेलश राजकारण सुरु होते व कर्जत मध्ये सध्या युती आघाडीचे नाही तर व्यक्ती निवडायचा ट्रेंड दिसून येत आहे. विविध पक्षाच्या व्यक्ती इथून तिथे जाताना व विविध नेत्यांचे समर्थक पक्षाचे नाही तर व्यक्तीचे काम करताना दिसून येत आहेत.