



कर्जत मधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या टेकडीवर भ्रष्ट राजकीय उद्देशाने बांधलेल्या आर एम सी भिंतीला तडे गेले असून ही भिंत निकृष्ट दर्जाची बांधल्याने व जिल्हा परिषदेचे अभियंता खिलारे यांनी दुर्लक्ष केल्याने माती व कंत्राटदार यांनी टाकलेल्या डेब्रिज ने सरकली असून भिंतीसह टेकडीचा भाग खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही प्रश्न विचारेपर्यंत प्रशासनाने काहीच हालचाल याबाबत केली नव्हती. आता बातमी नंतर पुढे काय होते? हे पाहणे गरजेचे आहे.
कर्जत ही निसर्गसंपन्न नगरी आहे. या नगरी मध्ये विपुल निसर्ग संपदा असून या निसर्ग संपदेचे लचके तोडायचा राजकीय व प्रशासकीय कार्यक्रम अविरत सुरु असून यावर नागरिक चर्चा करण्याच्या पलीकडे काहीही करत नाहीत हे दुर्दैव आहे. तक्रार करून कार्यक्रम तडीस नेणाऱ्या कार्यकर्त्यांची अथवा संस्थाची कर्जत मध्ये वानवा झाली आहे. यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या राजकीय लोकांच्या संपत्ती मध्ये भरमसाठ वाढ झाली असून जनतेच्या पैश्याचा ऱ्हास होतं आहे.
कर्जतच्या निसर्ग संपन्न टेकडी वर विपुल वन संपदा असून येथे तहसीलदार कचेरी व विविध सरकारी कार्यालय होती. या ठिकाणी आतां जिल्हा परिषद अभियंता यांचे कार्यालय, विश्रामगृह व गृह विभागाचे कारागृह असून तिथे थोड्या फार प्रमाणात नागरिकांची ये जा असते.
सकाळी व संध्याकाळी येथे कर्जतचे विविध वयातील नागरिक व्यायाम करायला येतात व या नागरिकांनी निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून वीस वर्षात शेकडो झाडांची लागवड करून इथला निसर्ग जपण्याचे अतुलनीय कार्य केले आहे.


टेकडीवर शेकडो प्रकारचे पक्षी व सरपटणारे प्राणी असून या ठिकाणी करण्यात आलेल्या अनावश्यक विकासाने निसर्गाची हानी झाली आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणी असलेल्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करून काँक्रिटचा रस्ता व संरक्षक भिंत तसंच गटर बांधण्यात आले व त्याचे डेब्रिज हे ज्या ठिकाणी झाडांची लागवड केली आहे व गवत येते अशा ठिकाणी टाकून पूर्ण निसर्गाची वाट लावलेली आहे. यामुळे जीव जंतू यासह झाडा झूडपांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. याबाबतची काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी असणाऱ्या इंजिनियर वर जिल्हा परिषद, वनविभाग अथवा शासनाने काहीच कारवाई केली नाही.

कंत्राटदार यानी टाकलेले डेब्रिज 👆






असा विकास काय कामाचा? हा प्रश्न येणारे जाणारे नागरिक विचारत आहेत. मुळात जी टेकडी ढासळण्याची भीती आहे. म्हणून ती खोदून तिथे सरक्षण भिंत बांधली तिथे काँकरीट चा रस्ता का केला? तिथे अधिक लोड वाढवायचची काही गरज नव्हती. या रस्त्याच्या लोडने व टाकलेल्या डेब्रिज ने भिंत खचली असून हा पूर्ण लोड आता भिंतीवर पडत असल्याने भिंत एका बाजूने सरकली आहे. तर एका बाजूला भिंतीला उभा तडा गेला आहे.
शेजारी बांधलेल्या गटाराच्या जागेतून टेकडीतील वरच्या भागात जाणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला असून विविध प्रकारचे सर्प, विंचू, सरडे, चोपया, यांना सरपटण्यास अडचण झाली आहे.
वास्तविकता जिथे निसर्ग संपदा विपुल प्रमाणात आहे तिथे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह व नैसर्गिक खड्डे, बीळ बंदिस्त करून काँकरीट चे रस्ते करून ही काम प्रस्ताव देणाऱ्या राजकीय लोकांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता व बेजबाबदार इंजि. ला आपली टक्केवारी घेऊन फक्त बिल काढायला मदत करायची होती असे दिसून येते. निसर्ग अथवा कर्जतच्या सामान्य लोकांना काहीही किंमत नाही.
याबाबत जिल्हा परिषद अभियंता श्री शेळके यांच्याकडे आम्ही कंत्राटदार यांच्यासह इंजि. वर कारवाई करणार का? अशी विचारपूस केली असता. भिंतीचे कामाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाय योजना करू व डेब्रिज तात्काळ हटवू असें तोंडी आश्वासन त्यानी दिले आहे.
राज्याचा पर्यावरण विभाग हा सत्तेतील स्थानिक राजकीय नेत्याच्या पक्षाचे जणू बाहुले असून या बातमी नंतर ते याची पाहणी व कारवाई करण्याची शक्यता 0 आहे. नागरिकांना ही टेकडी जपावी यासाठी कोर्टात अथवा हरीत लवदात जावं लागणार आहे. अन्यथा इथल्या निसर्गाचे काही खरे नाही.
या बातमी नंतर शासन व जिल्हा परिषद अध्यक्ष/सीईओ /जिल्हाधिकारी कार्यालय यांनी या कामासाठी जबाबदार कंत्राटदार व इंजि.वर खातेनिहाय चौकशी व फौजदारी कारवाई केल्यास आम्हाला आश्चर्य वाटेल. त्यानी आपल्या परंपरेनुसार जनतेच्या पैश्याची व निसर्गाची हानी करत राहावी व कोणावर कारवाई न करण्याची राजकीय साठेमारीची परंपरा जिवंत ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे.
निसर्गाला व नागरिकांना कोणी वाली नाही. आतां यावर नागरिकांनीच आवाज उठवावा लागेलं नाही तर शेकडो वृक्ष असणाऱ्या टेकडीचा मलबा खाली येऊन जीवित हानी होण्याची खात्री निर्माण झाली आहे.
-हृषीकेश जोशी.
#corruption #karjat #karjatdiaries #raigadzp #raigadcollector #bjpmaharashtra #DevendraFadanvis #eknathshinde #greentribunal #environment #savenature
